नवी दिल्ली : केंद्र सरकार ने 2024-25 हंगामासाठी उसाच्या वाजवी आणि लाभदायक किमतीत (FRP) प्रति क्विंटल 25 रुपयांनी वाढ केल्यानंतर साखर उद्योग पुन्हा इथेनॉल उत्पादनासाठी बी हेवी मोलॅसिस आणि उसाच्या रसाचे प्रमाण वाढविण्याची सरकारला विनंती करत आहे. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (WISMA) उसाच्या एफआरपीमध्ये वाढ केल्यास साखर उद्योगावर आर्थिक ताण पडण्याची भीती व्यक्त केली. ‘चीनीमंडी’शी बोलताना WISMA चे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे म्हणाले की, इथेनॉल उत्पादनासाठी बी हेवी मोलॅसिस आणि उसाच्या रसाच्या वापरावर घातलेल्या मर्यादेमुळे साखर उद्योग आधीच अडचणीत आहे, त्याशिवाय 2024-25 च्या साखर हंगामासाठी एफआरपी वाढल्याने अडचणीत आणखी भर पडणार आहे.
बी.बी.ठोंबरे म्हणाले की, प्रतिटन 250 रुपयांची वाढ ही आजपर्यंतची सर्वाधिक असून त्यामुळे साखर उद्योगावर आर्थिक ताण वाढणार आहे. इथेनॉलमुळे आम्ही त्वरित एफआरपी पेमेंट करायचो, परंतु आता कारखाने डिफॉल्ट होत आहे. महाराष्ट्रातील ५० टक्क्यांहून अधिक साखर कारखाने थकीत आहेत. सुरळीत पेमेंट सुनिश्चित करण्यासाठी, आम्ही सरकारला इथेनॉल उत्पादनासाठी साखर वळवण्याची विनंती करतो. केंद्र सरकारने साखरेचे उत्पादन 290 लाख टन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता, परंतु आता उत्पादन 325 लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
देशांतर्गत वापरासाठी 285 लाख टन आणि शिल्लक साठा सुमारे 100 लाख टन आहे. जोपर्यंत सरकार इथेनॉल उत्पादनासाठी बी हेवी मोलॅसिस आणि उसाचा रस वळवण्यास परवानगी देत नाही, तोपर्यंत साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची ऊस बिले भागविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ठोंबरे पुढे म्हणाले, साखर हंगाम केवळ दीड महिने उरला असून, सरकारने आमच्या मागणीवर विचार करावा, जेणेकरून गेल्या तीन महिन्यांत झालेले नुकसान भरून काढता येईल. सरकारने इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी उसाचा रस वापरण्यास परवानगी द्यावी अन्यथा, आम्हाला सुधारित एफआरपी देणे परवडणार नाही. त्याचप्रमाणे सरकारने साखरेची एमएसपी किमान 3500 रुपये प्रति क्विंटल करण्याचा विचार केला पाहिजे, असे ठोंबरे म्हणाले.
अन्न मंत्रालयाने डिसेंबरच्या सुरुवातीला साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस किंवा सिरप वापरू नये असे निर्देश दिले होते. मात्र, आपल्या निर्णयावरून ‘यू-टर्न’ घेत केंद्र सरकारने डिसेंबरच्या मध्यात, इथेनॉल उत्पादनासाठी ज्यूससह बी-हेवी मोलॅसिसचा वापर करण्यास परवानगी दिली, परंतु सध्याच्या हंगामात इथेनॉल उत्पादनासाठी साखरेचा केवळ 17 लाख टनांपर्यंत वापर करण्याचे निर्देश दिले.बुधवारी (21 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने साखर हंगाम 2024-25 साठी उसाच्या 10.25% रिकव्हरीला 340 रुपये प्रति क्विंटल एफआरपी देण्याचा निर्णय घेतला. ही एफआरपी वाढ चालू हंगामाच्या 2023-24 च्या उसाच्या एफआरपीपेक्षा सुमारे 8% जास्त आहे. सुधारित एफआरपी 01 ऑक्टोबर 2024 पासून लागू होईल.