नवी दिल्ली : केंद्र सरकारने बुधवारी 2024-25 साखर हंगामासाठी उसाची एफआरपी सध्याच्या 315 रुपये प्रति क्विंटलवरून 340 रुपये प्रति क्विंटल केली आहे. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. पुढील हंगामासाठी उसाची एफआरपी वाढवण्याच्या निर्णयामुळे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना फायदा होणार असल्याचे ISMA ने म्हटले आहे.
ISMA चे अध्यक्ष मंडावा प्रभाकर राव म्हणाले की, एफआरपी वाढीमुळे शेतकऱ्यांना ऊस पिकाचा वाढता खर्च भागवण्यास मदत होईल. या निर्णयामुळे साखर उद्योगाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 10,000 कोटींहून अधिक रक्कम अतिरिक्त मिळेल. ISMA ने साखर उद्योगाच्या आर्थिक बळकटीसाठी साखरेच्या MSP (किमान विक्री किंमत) मध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे.
राव म्हणाले, CACP साखरेच्या MSP ची शिफारस देखील करू शकते, जी उद्योगाच्या अंदाजानुसार उसाची 340 रुपये प्रति क्विंटल FRP च्या पार्श्वभूमीवर सुमारे 3,900 रुपये प्रति क्विंटल होते. त्याचप्रमाणे इथेनॉलच्या किमती देखील उच्च एफआरपी आणि वाढीव इनपुट खर्चाच्या आधारे सुधारित केल्या जातील. ISMA ने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून म्हटले आहे की, साखर उद्योगाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी CACP ने शिफारस केलेल्या एमएसपीच्या आधारावर उद्योगाकडून दरवर्षी 4-5 दशलक्ष टन साखर खरेदी करावी, जेणेकरुन कोणत्याही धोरणात्मक बदलाचा परिणाम न होता उद्योग इथेनॉल मिश्रणाचे सरकार ने निश्चित केलेले उद्दिष्ट गाठू शकेल.
पत्रकात पुढे म्हटले आहे कि, ऊस हे एकमेव असे पीक आहे, जिथे सरकारच्या कोणत्याही मदतीशिवाय शेतकऱ्यांना साखर उद्योगाकडून एफआरपीची 100% हमी दिली जाते. दुसरीकडे, सरकारी प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे, भारतातील साखरेची किंमत ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त आहे. मंडावा प्रभाकर राव म्हणाले कि, सरकारच्या एमएसपी वाढीसारख्या सक्रिय धोरणात्मक हस्तक्षेपाने अशी अनुकूल परिस्थिती भविष्यातही कायम राहू शकेल, जेणेकरून साखर कारखाने पूर्वीप्रमाणे कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पेमेंट करू शकतील.