छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील श्रीसंत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कारखान्यावर वर्चस्व प्रस्थापित केल्यामुळे गुरुवारी (दि. २२) कारखान्याच्या चेअरमनपदाची सी. ए. सचिन घायाळ यांची निवड करण्यात आली. कारखान्याच्या आतापर्यंतच्या चेअरमनपदाच्या कार्यकाळातील ते सर्वात तरुण व कामगार पुत्र चेअरमन आहेत. व्हॉइस चेअरमनपदी प्रल्हाद औटे यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. सर्व संचालकांच्या सहकार्याने कारखान्यात नावीन्यपूर्ण योजना सुरू करण्यात येईल. कारखान्याला नवसंजीवनी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असे चेअरमन घायाळ यांनी सांगितले.
कारखान्याच्या सभागृहामध्ये चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाली. नवनिर्वाचित चेअरमन सचिन घायाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, चेअरमन पदाच्या कार्यकाळात कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी व कामगारांचे हित जोपासण्याचा प्रयत्न करू कारखान्याचे ज्येष्ठ कामगार विक्रम काका घायाळ यांचा पुत्र या नात्याने कारखान्याच्या स्तरावर कुठलेही राजकारण केले जाणार नाही, असे चेअरमन सचिन घायाळ यांनी सांगितले. व्हाईस चेअरमन प्रल्हाद औटे, माजी चेअरमन तुषार सिसोदे, संचालक आबासाहेब मोरे, दत्तात्रेय आम्ले, अक्षय शिसोदे, भाऊसाहेब पिसे, एकनाथ नवले, दत्ता वाकडे, भारतराव घायळ, विक्रम घायाळ, गणेश घायाळ, दीपक फांदाडे, दिगंबर गोर्डे, बाबासाहेब खरात, शिवाजी जाधव, रमेश झिने, कचरू बोबडे, ताराबाई रामेश्वर घायाळ, उषाबाई सुखदेव थोरात, अनुराधा कैलास तुपकरी, अमोल घायाळ, गणेश पवार आदी उपस्थित होते.