कोल्हापूर : विभागातील साखर कारखान्यांच्या तोडणी यंत्रणा अकार्यक्षम ठरल्या आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोयता हातात घेऊन तोडणी मजूर बनावे लागले आहे. कारखाने ऊस नेणार म्हणून अनेक शेतकऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांत उसाला पाणी दिलेले नाही. आता उशीर झाल्याने उसाला तुरे येऊन वजनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे. अठरा महिन्याचा आडसाली ऊस शेतात तसाच आहे. परिणामी शेतकऱ्यांनी स्वतः ऊस तोडी सुरू केल्याचे परिसरत दिसून येते.
ऊस तोडणीसाठी मजुरांकडून एकरी पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत मागणी केली जात आहे. याशिवाय खुशाली, ट्रॅक्टर चालकाला पैसे द्यावे लागतात. एवढे करुनही ऊस तोडणीस मदत, ट्रॅक्टर भरणीस मदत कावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रती टन पाचशे रुपये जादा खर्च होत आहेत. ऊस तोडणी मजुरांना गत हंगामात तोडणीसाठी २७३ रुपये व १९ टक्के कमिशन मिळून ३२४ रुपये मिळत होते. यावर्षी त्यात वाढ होऊन कमिशनसह ४३९ रुपये मिळतात. ऊस पिकातील २५ टक्के खर्च तोडणी ओढणी यंत्रणेवरच जातो. खतामध्ये ५२ टक्के, तणनाशकात ८० टक्के दरवाढ झाल्याने शेतकरी वैतागले आहेत.