नवी दिल्ली : केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी उसाच्या एफआरपीमध्ये २५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे उसाची एफआरपी ३१०० रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे साखर उद्योगात अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पातळीवर साखर कारखानदारीला दिलासा देण्यासाठी साखरेच्या हमीभावामध्ये वाढ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर साखरेचा हमीभाव प्रती क्विंटल ३,७०० ते ३,८०० रुपयांपर्यंत निश्चित होऊ शकतो, असे सांगण्यात येते.
देशातील साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी कार्यरत्त असलेल्या ISMA, WISMA यासह अन्य विविध संघटनांनी एफआरपीप्रमाणेच साखरेच्या एमएसपीमध्येही वाढ करावी, अशी मागणी लावून धरली आहे. या संघटनांनी दावा केला आहे कि, साखर उद्योग टिकायचा असेल तर एमएसपीमध्ये वाढ कारणे जरुरीचे आहे. अन्यथा साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेवर देणे जिकीरीचे होणार आहे.
केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी देशातील कारखानदारीच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राने प्रयत्न सुरू केल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. केंद्राने साखरेच्या किमान हमीभावाची संकल्पना २०१८ मध्ये प्रत्यक्ष कृतीत आणली. यानंतर उसाच्या किमान लाभकारी व वाजवी मूल्यामध्ये (एफआरपी) ८ वेळेला वाढ केली. परंतु, साखरेच्या हमीभावात एकदाही वाढ केलेली नाही. याची दखल घेऊन साखरेच्या हमीभावात वाढ करण्याविषयी सकारात्मक हालचाली सुरू आहेत.
केंद्र सरकारने गेल्या वर्षी साखर निर्यातीवर बंदी घातली. त्यानंतर इथेनॉल उत्पादनाच्या प्रक्रियेतही बदल केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऊसाच्या एफआरपीत वाढ केली आहे. त्यामुळे साखर कारखानदार अस्वस्थ आहेत. या विषयावर कारखानदारांच्या राष्ट्रीय संघटना सरकारबरोबर लढत आहेतच. त्यामुळे कारखानदारीच्या अडचणींवर इलाज काढण्यासाठी केंद्रीय पातळीवर हालचाली सुरू आहेत.
केंद्र सरकारने 2024-25 साखर हंगामासाठी उसाची एफआरपी सध्याच्या 315 रुपये प्रति क्विंटलवरून 340 रुपये प्रति क्विंटल केली आहे. पुढील हंगामासाठी उसाची एफआरपी वाढवण्याच्या निर्णयामुळे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना फायदा होणार आहे. एफआरपी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस पिकासाठीचा वाढता खर्च भागवण्यास मदत होईल. या निर्णयामुळे साखर उद्योगाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 10,000 कोटींहून अधिक रक्कम दिली जाईल. केंद्र सरकारने नेहमीच साखर उद्योगाला पाठबळ दिले आहे. आता सरकारने एफआरपीप्रमाणे देशातील साखर उद्योगाची मागणी असणाऱ्या एमएसपी (MSP) मध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे. साखर कारखान्यांना पाठबळ देण्यासाठी एमएसपी प्रति क्विंटल कमीत कमी 3600 रूपये करण्याची आवश्यकता आहे.
– समरजीतसिंह घाटगे, अध्यक्ष शाहू ग्रुप (कोल्हापूर)