पुणे : राज्यातील मजूर ऊस तोडणीसाठी परराज्यामध्ये जातात. चार महिन्यांमध्ये मुलांचे शिक्षण वाऱ्यावर पडते. सद्यस्थिती साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे मजूर परतू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधीचा अभाव असल्याने शेकडो कुटुंबे रोजगाराच्या शोधात चार ते पाच महिने परराज्यामध्ये जाऊन ऊस तोडणी करतात. त्या उत्पन्नातून संसाराचा गाडा चालवतात. या कालावधीत स्थानिक बाजारपेठांमध्ये उलाढाल जवळपास ठप्प असते. कारण बाजारपेठेमध्ये ग्राहक नसतात.
मजूर परतल्यानंतर स्थानिक बाजारपेठांमध्ये उलाढाल सुरु होते. मजुरांवर बाजारपेठ अवलंबून आहे. फक्त सहा महिने व्यवसाय हे अनेक दुकानदारांना परवडत नाही. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक इतर जिल्ह्यांमध्ये, तालुक्यामध्ये जाऊन व्यवसाय करतात. मजुरांना तालुक्यामध्येच रोजगार उपलब्ध करून शासनाने दिला तर बाजारपेठेतील व्यवसायात चालतील, असे मत व्यावसायिकातून व्यक्त केले जात आहे. राज्यातही काही कारखान्यांचा हंगाम संपला असून ते मजूर ही परतीच्या मार्गावर आहेत.