शिरोळ : शिरोळ तालुक्यातील सात क्षारपड जमीन सुधारणा संस्थेमार्फत १ हजार ५४५ हेक्टर क्षेत्रावर क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प राबवण्याच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सादर केलेल्या प्रस्तावास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पांतर्गत प्रति हेक्टरी ६० हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग होणार आहेत. मुख्य अभियंता तथा सहसचिव सुनील काळे यांनी सदर प्रस्तावास मंजुरी दिली असल्याची माहिती श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी दिली.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेडशाळ, अर्जुनवाड, कवठेसार, गणेशवाडी, कुटवाड, हसूर, घालवाड या गावांमध्ये सच्छिद्र निचरा प्रणालीचा वापर करून क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम राबविण्यासाठी ९ कोटी ४५ लाख ५४ हजाराचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. केंद्र शासनाने यापूर्वी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत या उपयोजनेअंतर्ग अखर्चित असलेला २ कोटी १९ लाखाचा निधी (यामध्ये केंद्र हिस्सा एक कोटी ३२ लाख आणि राज्य हिस्सा ८७ लाख रुपये) प्रकल्पासाठी खर्च करण्यासही मान्यता दिली होती. आता उर्वरित निधीही प्राप्त झाल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे.