हिंगोली : कुरुंदा येथील टोकाई सहकारी साखर कारखान्याला घरघर लागल्याने मूळ मशिनरी विकण्यासाठी लिलाव काढण्यात आला. टोकाई साखर कारखाना विकण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या वर्षी ऊस बिल थांबल्याने शेतकऱ्यांनी मुबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. जनहित याचिका दाखल केली होती. त्या आधारे १२५० मेट्रिक टन प्रतिदिनी गाळपाची मशिनरी विकण्याचे टेंडर काढण्यात आले आहे.
अचानकपणे कारखान्यातील मुख्य मशीन व सोबत असलेल्या लहान-लहान मशिनरी विकण्याचे टेंडर निघाले आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. आगोदर अडचणीत आलेला कारखाना विक्री करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. अजूनही साडेनऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर गेले नाहीत. त्यामुळे शासनाकडून यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार केला जात आहे. कारखान्याकडे २८.१६ कोटी थकले होते. यापैकी १४.३३ लाख ऊस पुरवठादारांना अदा केले. मोलॅसेस व इतर व्यवस्थेतून ४.२० कोटी भरले. आता ९.६२ कोटी रुपये अदा करायचे बाकी आहेत. याचा अहवाल शासनालाही गेला आहे.
कारखान्याकडे असलेली थकित रक्कम मिळण्यासाठी शेतकरी वारंवार तगादा लावत आहेत. कारखान्याच्या कार्यालयावरही शेतकरी धडकले होते. मात्र गळित हंगाम बंद असल्याने प्रशासन हतबल आहे. दुसरीकडे याबाबत शासनाकडेही वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची रक्कम अदा करण्यासाठीही दबाव वाढत चालला आहे.
कारखान्याचे संचालक खोब्राजी नरवाडे पाटील म्हणाले कि, टेंडर निघाल्याची माहिती अधिकृतपणे आमच्याकडे नाही. शनिवारी संचालक मंडळाची बैठक होणार आहे. कारखाना कसा वाचविता येईल आणि शेतकऱ्यांचे बिल कसे देण्यात येईल, यावर चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. त्यानंतरच सर्व काही स्पष्ट होईल. संचालकांच्या बैठकीनंतरच अधिकृतपणे सांगता येईल.