सातारा : जिल्ह्यातील सर्व खासगी व सहकारी अशा १७ साखर कारखान्याची प्रती दिन गाळप क्षमता ९० हजार ४५० मे टन आहे. मात्र, सध्या निम्याहून कमी म्हणजेच ३८ हजार १३८ प्रतीदिन क्षमतेने गाळप सुरू आहे. त्यामुळे गाळप हंगाम वाढत चालला आहे. तोकड्या ऊस तोडणी यंत्रणेमुळे हंगाम लांबला आहे. मागील सलग ३ हंगामात जिल्ह्यात १०० लाख क्विंटलपेक्षा जास्त साखर उत्पादन झाले आहे. सातारा जिल्ह्यात एकूण १७ कारखाने ऊस गाळप करत आहेत. यात ९ साखर कारखाने सहकारी आहेत.
कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ४५ हजार २०० आहे. जिल्ह्यात ८ खासगी कारखाने असून त्यांची दैनंदिन गाळप क्षमता ४५ हजार २५० आहे. यंदाचा गाळप हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू झाला. जवळपास १२० दिवसांचा हंगाम संपला. प्रती दिन ९० हजार ४५० प्रमाणे गाळप झाले असते तर १०० लाख क्विंटलचा टप्पा पूर्ण झाला असता, मात्र फेब्रुवारी अखेर जिल्ह्यात ८२ लाख २४ हजार मे टन गाळप झाले असून ८५ लाख १२ हजार १७३ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.