सोलापूर : मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड अकलूजच्या वतीने आदिवासी भागातून ऊसतोड करण्यासाठी माळशिरस तालुक्यात आलेल्या महिला व बालक यांना साड्या, लहान मुलांना कपडे, खाऊ व चपला वाटप करण्यात आले. लवंग २५/४ येथे डॉ. पवार यांच्या ऊसाच्या फडात तोडणीसाठी हे महिला कामगार आले असताना ऊसतोड मजूर महिलांना व मुलांना जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून साड्या, लहान मुलांना कपड़े, चप्पल, खाऊ वाटप करण्यात आले.
जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा मनोरमा लावंड म्हणाल्या की, जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबविले जात असून त्यातून सामाजिक जबाबदारी जपली जात आहे. तळागाळातील घटकांना नेहमीच मदत व सहकार्याचा हात देण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सदस्या आक्काताई माने, मनीषा गायकवाड, शुभांगी क्षीरसागर, शारदा चव्हाण, संगीता जगदाळे, सुवर्णा गोरवे, वंदना पवार व उषा काजळे यांचेसह जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या.