नांदेड : थकीत बिलासाठी टोकाई सहकारी साखर कारखाना विक्रीला काढण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील ७,१०० सभासद शेतकऱ्यांसह ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. कारखान्यावर भाजप नेत्याचे वर्चस्व असून गेल्यावर्षी कारखान्याकडे १३ कोटी रुपये थकीत रक्कम होती. न्यायालयाच्या आदेशानंतर आरसीसी कारवाई करून थकीत रक्कम द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनी थकीत रक्कम मिळविण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आरसीसीची कारवाई करून शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश दिले होते. परंतु हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ठाम भूमिका न घेतल्याने शेतकऱ्यांना अद्यापही पैसे मिळालेले नाहीत. सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.