पुणे : शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ज्यांच्या हातात विश्वासाने सत्ता दिली, त्यांनीच साखर कारखाना बंद पाडला. आता कारखाना पुन्हा सुरू करण्याची धमक आमच्यातच आहे. आपल्याकडे अर्थ खाते आहे, दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री आहेत. कारखाना सुरू होण्यासाठी सर्व मदत होऊ शकते. अनेक कारखान्यांना मदत करून उभे केले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे आयोजित शेतकरी मेळावा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये अजित पवार बोलत होते.
हवेलीचे शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांना अजित पवार यांनी कारवाईचा इशारा दिला. ते म्हणाले की, सर्वांना आता माझी विनंती आहे, संचालक मंडळाकडे जा, त्यांना सांगा, ‘दादा म्हणत होते कारखाना सुरू करतो, तसे असेल तर आपण सगळेच तिकडे जाऊ’ एक संधी देतो, नाहीच आले तर सहकार कायद्याप्रमाणे कारवाई करून याप्रश्री न्याय देऊ. कारखान्याबाबत एक बैठक घेतली होती. मात्र, ती बैठक फोल ठरली. त्यानंतर कारखाना बंद पडला. कारखान्याला ऊस जवळ आणि मुबलक आहे. अनुकूल परिस्थिती आहे. कारखाना काटकसरीने चालवायला पाहिजे. कोजन, डिस्टलरी आदी प्रकल्प आहेत. गरजेचा स्टाफ आहे, त्यामुळे सगळ्यांचा सहभाग असेल तर अडचणीतील कारखाना नक्की बाहेर काढू. तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांनी प्रास्ताविक केले. सुधीर फराटे इनामदार, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, दादा पाटील फराटे आदींची भाषणे झाली. बाबासाहेब फराटे यांनी सूत्रसंचालन केले. आरती भुजबळ यांनी आभार मानले.