छत्रपती कारखान्याने ‘वन टाइम सेटलमेंट’ने ६१ कोटी वाचवले : अध्यक्ष प्रशांत काटे

पुणे : छत्रपती सहकारी साखर कारखान्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी ज्या गोष्टी करणे गरजेचे होते, त्या संचालक मंडळाने धाडसाने केल्या, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी केले. कारखान्याने बँकांची ‘वन टाइम सेटलमेंट’ केल्याने ६१ कोटी ४६ लाख रुपये वाचविण्यात यश आले. यामध्ये जवळपास सर्व बँकांचे कर्ज फेडण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे यांचे सहकार्य मिळाले. कारखान्याच्यावतीने काटे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

काटे म्हणाले की, ३००० टन गाळप क्षमतेचा व सहवीजनिर्मितीचा प्रकल्प उभा करताना २९ कोटी रुपये कारखान्याला घालावे लागले. त्यामुळे कारखान्यावर ६० कोटी रुपयांचा बोजा पडला. अतिरिक्त उसाच्या काळात सभासदांचा ६३१ एकर ऊस गाळपाविना शिल्लक राहिला होता. त्यावेळी सर्व गोष्टी केल्या नसत्या तर आज छत्रपती कारखाना थांबला असता. कारखान्यावर १२८ कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे असा गैरसमज सभासदांनी करून घेऊ नये. बँकांचे ज्यादा व्याजदरांचे जे कर्ज होते त्याची परतफेड करण्यात आली आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, संचालक बाळासाहेब पाटील, गणेश झगडे, राजेंद्र गावडे, रसिक सरक, नारायण कोळेकर, पांडुरंग दराडे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर, शेतकरी जालिंदर शिंदे, कामगार नेते युवराज रणवरे, ऊस विकास अधिकारी प्रवीण कांबळे, सुखदेव सानप, भाऊसाहेब आंधळे आदी उपस्थित होते. अनिल रुपनवर यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here