कोल्हापूर : कर्नाटक सीमाभागातील साखर कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने या महिना अखेरीस बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच महिन्यांच्या कामानंतर ऊस तोडणी मजुरांना परतीचे वेध लागले आहेत. मजुरांकडून साखर कारखान्यांच्या शेती खात्याच्या अधिकाऱ्यांकडे गळीत हंगाम केव्हा बंद होणार ? अशी विचारणा सुरू झाली आहे.
जिल्ह्यात आणि सीमाभागात अहमदनगर, बीड, सांगोला, जत, परभणी, विजापूर, लातूर या भागातून ऊस तोडणी मजूर येतात. ऊस तोडणीसाठी पती व पत्नी मिळून एक कोयता या हिशेबाने १० ते १५ कोयत्यांच्या टोळीचा करार केली जातो. वाहनमालकाकडून हंगामापूर्वी प्रती कोयता १ लाखापर्यंत उचल घेतली जाते. काही कुटुंबे कारखाना साईटवरच झोपड्या बांधून राहतात, तर काहींना ट्रक, ट्रॅक्टरच्या तोडणी कार्यक्रमानुसार गावोगावी झोपड्या बांधून फिरावे लागते. सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. खोडवा, निडवा उसाची तोडणी सुरू पुरेसा ऊस तोडला जात नाही. त्यामुळे तोडणी मजूर कंटाळले आहेत. आता त्यांना परतीचे वेध लागल्याचे दिसून येते.