कोल्हापूर : भारतात उत्पादित होणाऱ्या गुळाला जगभरातून मोठी मागणी आहे. गुळाला आंतरराष्ट्रीय मिठाई म्हणून ओळख मिळत असल्याचे ‘अपेडा’च्या आकडेवारीतून दिसून आले आहे. सद्यस्थितीत देशातून जगभरातील ५० हून अधिक देशांमध्ये गुळाची निर्यात होत आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२३ या ९ महिन्यांत देशातून ३ लाख ७६ हजार ९५२ मेट्रिक टन गुळाची निर्यात झाली आहे. इंडोनेशिया, केनिया, नेपाळ, यूएसए, युनायटेड अरब या देशांमध्येही गुळाला मोठी मागणी आहे. एकूण निर्यातीपैकी या पाच देशांत १,९१२ कोटी रुपयांचा गूळ निर्यात झाला आहे. त्यापासून देशाला २,५७८ कोटींचे परकीय चलन मिळाले आहे.
सद्यस्थितीत देशातील महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये गुळाचे सर्वांत जास्त उत्पादन होते. त्यापाठोपाठ गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक येथेही गुळाचे उत्पादन घेतले जाते. जागतिक गुळाच्या एकूण उत्पादनापैकी ७० टक्क्यांहून अधिक उत्पादन भारतात होते. गूळ ‘औषधी साखर’ म्हणून ओळखला जातो गुळाची पौष्टिकदृष्ट्या मधाशी तुलना केली जाते. गुळात ग्लुकोज आणि सुक्रोज असतात. खनिजे आणि जीवनसत्त्वेदेखील असतात. गुळातील खनिज सामग्रीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह आणि जस्त आणि तांबे यांचा समावेश आहे.
व्हिटॅमिन सामग्रीमध्ये फॉलिक ॲसिड आणि बी- कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे समाविष्ट आहेत. औषधी साखर म्हणून गुळाला जागतिक स्तरावर मागणी आहे. सेंद्रिय उसाचे उत्पादन घेऊन सेंद्रिय पद्धतीनेच गूळ आणि गुळाच्या पावडरचे उद्योग सुरू झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यंदा उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी आपला मोर्चा गुऱ्हाळघरांकडे वळवला आहे. गुऱ्हाळघर चालकांकडून रोखीने पैसे दिले जात असल्याने यंदा उत्तर प्रदेशातील अनेक साखर कारखान्यांना शेवटच्या टप्प्यात उसासाठी धावाधाव करावी लागत आहे.