कोल्हापूर : ऊस लागण ते गूळ बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यापर्यंतचा खर्च शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी गुऱ्हाळघरांकडे पाठ फिरवली आहे. पूर्वी जिल्ह्यात एक हजारावर गुऱ्हाळघरे होती. सध्या गुळाला चांगला दर असताना, शेतकऱ्यांनी गुऱ्हाळघराकडे वळणे अपेक्षित असताना जिल्ह्यात केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतपत गुऱ्हाळघरे शिल्लक राहिली आहेत.
कोल्हापूर ही गुळाची मोठी बाजारपेठ असूनही सरकारचे दुर्लक्ष, व्यापाऱ्यांची मनमानी आणि गुळाला योग्य भाव मिळत नसल्याने पारंपरिक व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. गुळाला योग्य हमीभाव मिळाला नाही, तर गूळ उद्योग नेस्तनाबूत होणार आहे. सध्या साखर मिश्रित गुळाचा बोलबाला आहे. कामगारांसह विविध प्रश्नांमुळे अनेकांनी गुऱ्हाळघरे बंद केली आहेत.