सातारा : राज्य सरकारने १३ सहकारी साखर कारखान्यांना तब्बल १,९०० कोटींची कर्जहमी दिली आहे. याचा सर्वाधिक फायदा सातारा जिल्ह्यातील किसनवीर आणि खंडाळा या कारखान्यांना होणार आहे. दोन्ही कारखान्यांना मिळून तब्बल ४५५ कोटींची थकहमी देण्यात येणार आहे. यामध्ये किसनवीरला ३०५ कोटी तर खंडाळ्याला १५० कोटींची थकहमी मिळणार आहे. याचा प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास प्राधिकरणा (एनसीडीसी) कडे पाठविण्यात आला आहे. या रकमेमुळे देणी, एफआरपीचे प्रश्न संपुष्टात येणार आहेत. याचा लाभ ऊस उत्पादकांना होणार आहे.
आ. मकरंद पाटील यांनी २०२१ मध्ये खंडाळा आणि किसनवीरची निवडणूक लढवून जिंकली. दोन्ही कारखाने सुरळीत चालवण्याचे त्यांच्यासमोर आव्हान होते. २०२२ मध्ये किसनवीर कारखान्याची निवडणूक झाली होती. दोन्ही कारखान्यांवर कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचा बोजा होता. किसनवीरचे चेअरमन झाल्यानंतर आ. मकरंद पाटील यांनी कारखान्याला सरकारकडून थकहमी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नव्हते. महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यावर अजित पवारांचा गट हा सत्तेत सामील झाला. यावेळी दोन्ही कारखान्यांना थकहमी मिळावी, या अटीवर आ. पाटील यांनी अजितदादा गटात प्रवेश केला होता. यासाठी त्यांचा पाठपुरावाही सुरू होता.