कोल्हापूर : शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या साथीने मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत आहे. गोरगरीब शेतकरी, सर्वसामान्य मतदारांच्या पाठबळावर मी निवडणूक मैदानात उतरलो आहे. मला निवडून संसदेत पाठवा. सरकारने साखरेची निर्यात बंदी उठवल्यास मी उसाला पाच हजार रुपये दर मिळवून देईन, अशी ग्वाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
गणेशवाडी (ता. शिरोळ) येथे आयोजित सभेत शेट्टी बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार शेट्टी यांनी लोकसभा प्रचाराचे रणशिंग फुंकले. शेट्टी म्हणाले, लोकसभेची निवडणूक मी स्वतंत्र लढणार आहे. आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील नृसिंहवाडी, औरवाड, गौरवाड, शेडशाळ, कवठेगुलंद, गणेशवाडी गावातील प्रमुख कार्यकर्ते, शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्यावर गणेशवाडीमध्ये गणपती मंदिर परिसरात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावकार मादनाईक, विठ्ठल मोरे, सागर शंभूशेटे, बंडू पाटील, जयवंत कोले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.