कोल्हापूर : कागल तालुक्यातील म्हाकवे येथील शेतकरी सतीश ऊर्फ सिद्राम शिवाजी पाटील यांनी खडकाळ माळरानावर एकरी १२० टन उसाचे उत्पादन घेऊन विक्रम केला आहे. प्रचंड मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी ही किमया साधली आहे. आता एकरी १४० टन घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली, तर नोकरदारांपेक्षाही अधिक उत्पन्न मिळविता येते, हे सतीश पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
सतीश यांनी २ जून, २०२२ रोजी को ८६०३२ जातीच्या उसाची एक डोळा पद्धतीने लागवड केली. तीन महिन्यांनंतर भरणी केली. रासायनिक खतांचे सहा ठोस दिले, तर जीवाणू खते, किटकनाशके, बुरशीनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, संजीवके फवारून आळवण्या घेतल्या. मशागत, कंपोस्ट, शेणखत यासह रासायनिक खते फवारणीसाठी एकरी १ लाख १५ हजार रुपये खर्च आला आहे. तर खर्च वजा जाता २ लाख ९३ हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे. त्यांना विजय मगदूम (सिद्धनाळ) यांचे मार्गदर्शन लाभले. कृषी सहायक ओंकार जाधव, महेश पटेकर, बंडू जंगटे, अमर पाटील (बानगे), केदार माळी यांचे सहकार्य लाभले.