गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे १० साखर कारखान्यांकडे थकले पैसे : शेळके

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील कायगाव परिसरातील शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे परिसरातील १० कारखान्यांकडे पैसे अडकून पडले आहेत. येत्या चार दिवसांत हे पैसे न मिळाल्यास शेतकरी पुणे येथील साखर आयुक्तालयात आंदोलन करतील, असा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांनी दिला आहे. ऊस बिले न मिळाल्याने कायगाव, अंमळनेर, लखमापूर, गणेशवाडी, भिवधानोरा, अगरवाडगाव, गळनिंब, भेंडाळा, धनगरपट्टी, पखोर परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

यासंदर्भात शेळके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या शेतकऱ्यांचा ऊस संगमनेर येथील भाऊसाहेब थोरात, गंगापूर (जयहिंद शुगर), कन्नड येथील बारामती ॲग्रो, प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखे पाटील, गणेशनगर, अशोकनगर येथील अशोक, भेंडा येथील ज्ञानेश्वर, शेवगाव येथील गंगामाई शुगर, सोनई येथील मुळा आणि वांबोरी येथील पीयूष शुगर कारखान्यांनी दोन महिन्यांपूर्वी तोडून नेला आहे. ऊस तोडून नेल्यानंतर १४ दिवसांत एफआरपीप्रमाणे उसाचे पेमेंट शेतकऱ्यांना देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. परंतु याबाबत अनेकदा तक्रारी करूनही अजूनही या कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट दिलेले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असल्याचे शेळके यांनी मंगळवारी साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here