नांदेड : विभागात ११ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. आजपर्यंत या विभागात एक कोटी १६ लाख चार हजार १९४ टन उसाचे गाळप करून एक कोटी १८ लाख ३९ हजार पाचशे क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावल यांनी ही माहिती दिली. अद्याप या विभागात मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक असल्याने २९ पैकी अद्याप १८ साखर कारखाने सुरू आहेत.
यंदा नांदेड विभागात नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगामासाठी २९ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. एक नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू झाला. विभागातील कारखान्यांनी एक कोटी १६ लाख चार हजार १९४ टन उसाचे गाळप तर एक कोटी १८ लाख ३९ हजार पाचशे क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. परभणी जिल्ह्यात बळीराजा साखर हा खासगी कारखाना सुरू आहे.
हिंगोली जिल्ह्यात भाऊराव चव्हाण, डोंगरकडा व पूर्णा सहकारी साखर कारखाना, वसमत हे दोन कारखाने सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना, देगाव हा कारखाना सुरू आहे. लातूर जिल्ह्यात विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा, ओंकार साखर कारखाना, विलास सहकारी साखर कारखाना निवळी, श्री साईबाबा शुगर, जागृती शुगर, रेणा सहकारी साखर कारखाना, रेणापूर, विलास सहकारी साखर कारखाना, तोंडापूर आदी कारखाने अद्याप सुरू आहेत.