परभणी : यंदा पाथरी तालुक्यात सरासरीपेक्षा निम्मा पाऊस झाल्याने तालुकावासीयांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तालुक्यातील सिंचन क्षेत्राला मोठा फटका बसला असून उसाच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. एकेकाळी १२ हजार हेक्टरवर ऊस लागवड होती. यावर्षी दोन हजार हेक्टरही ऊस लागवड झाली नाही. पर्यायाने कारखान्यांना ऊस टंचाईचा सामना करावा लागणार आहे. जायकवाडी धरणातून उन्हाळी हंगामासाठी पाणी मिळालेले नाही. गोदावरी नदीच्या पत्रातील तिन्ही बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र प्रचंड प्रमाणात घटले आहे.
गोदावरी नदीपात्रात तारुगव्हाण, मुदगल आणि ढालेगाव उच्च पातळीचे तीन बंधारे आहेत. दुसरीकडे जायकवाडी धरणाचा डावा कालवा पाथरी तालुक्याचा अर्धाअधिक भाग सिंचनाखाली आणतो. त्यामुळे या तालुक्यामध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. दोन्ही सिंचन सुविधांवर बारा हजार हेक्टरवर ऊस लागवड केली जाते. मात्र, यावर्षी तर पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. उन्हाळी हंगामातील उसाला याचा फटका बसला. शेतकऱ्यांनी जुना ऊस अगोदरच कमी केला आहे. नवीन उसाची लागवड कमी झाली, पर्यायाने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले आहे. तालुक्यात दोन खासगी कारखाने आहेत. या दोन्ही खासगी कारखान्यांना ऊस टंचाईचा सामना करावा लागणार आहे.