कोल्हापूर : मार्चअखेर राज्यात २०७ पैकी १२० साखर कारखाने बंद झाले आहेत. राज्यात अजूनही ८७ कारखाने सुरू असल्याने यंदाचा हंगाम एप्रिलच्या उत्तरार्धापर्यंत चालेल अशी शक्यता आहे. मार्चअखेर राज्यात १०५ लाख टनापेक्षा जास्त साखरेचे उत्पादन झाले आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात साखर उताऱ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीशी वाढ झाल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी या कालावधीत १०४ लाख टन साखर तयार झाली होती. गेल्या वर्षी तब्बल १८८ कारखाने बंद झाले होते.
गेल्या वर्षी या कालावधीत साखर कारखाने बंद होण्याचा वेग जास्त होता. यंदा मात्र हा वेग कमी असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी अंतिम टप्प्यात साखर उत्पादन कमी झाले होते. ९.९८ टक्के उतारा होता. यंदा मात्र साखर उतारा दहा टक्क्यांच्या वर गेला आहे. राज्यात अजूनही चार ते पाच लाख टन साखर तयार होण्याची शक्यता असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.
कोल्हापूर विभाग सर्वांत अधिक म्हणजे ११.५३ टक्के उतारा मिळवत साखर उत्पादनात अग्रेसर आहे. या खालोखाल पुणे विभागात २३ लाख टन साखरेची निर्मिती झाली. सोलापूर विभागात १९ लाख टन, तर अहमदनगर विभागात १३ लाख टन साखर तयार झाली. सोलापूर विभागात सर्वाधिक ३८ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागात २० कारखाने बंद झाले आहेत.
पुणे विभागात ऊस क्षेत्र ४०,००० हेक्टर ने घटले…
मागील वर्षी पावसाने मारलेली दडी आणि यंदाचा कडक उन्हाळा यामुळे शेतकऱ्यांनी उसाची लागण करण्यापासून हात आखडता घेतल्याचे पाहायला मिळत आहे.राज्याच्या कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे की, पाऊस आणि जलस्रोतांच्या कमतरतेमुळे पुणे विभागात ऑक्टोबर 2023 ते या वर्षी फेब्रुवारी 2024 या कालावधीत पुणे ग्रामीण, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांतील ऊस लागवडीचे क्षेत्र 3.43 लाख हेक्टरवरून 3.02 लाख हेक्टर म्हणजेच 40,000 हेक्टर घटले आहे.. पुणे जिल्ह्यात सरासरी 1.17 लाख हेक्टरच्या तुलनेत 99,207 हेक्टरवर उसाची लागवड झाली.
सोलापूर जिल्ह्यात 1.31 लाख हेक्टरच्या तुलनेत 1.13 लाख हेक्टरवर तर अहमदनगर जिल्ह्यात सरासरी 94,693 हेक्टरच्या तुलनेत 90,044 हेक्टरवर उसाची लागवड झाली, असे अहवालात म्हटले आहे. याचा 2024-25 मध्ये साखर उत्पादनावर विपरीत परिणाम होणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, पाण्याअभावी एप्रिल आणि मे महिन्यात नवीन पेरणी शक्य होणार नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्याचे साखरेचे उत्पादन 978 लाख क्विंटल (ऑक्टोबर 2023 -फेब्रुवारी 2024) होते, तर गेल्या हंगामातील (ऑक्टोबर 2022 – फेब्रुवारी 2023) उत्पादन 1,006 लाख क्विंटल होते.