पुणे : आतापर्यंत जिल्ह्यातील चार साखर कारखाने बंद झाले आहेत. चालू महिन्यात सर्व साखर कारखान्यांचा गळीत हंगाम बंद होण्याची शक्यता आहे. ज्या कारखान्यांचा गळीत हंगाम बंद झाला, अशा कारखान्यावरील तोडणी मजूर परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. वाढत्या उन्हाच्या चटक्यामुळे साखर कारखाने गळीत हंगाम लवकर संपवू लागले आहेत. त्यातच वाढत असलेली पाणी टंचाईची तीव्रता व जनावरांसाठी आवश्यक चाऱ्याची स्थिती बघता एप्रिलअखेरीस साखर कारखाने बंद होतील.
२८ फेब्रुवारी रोजी इंदापुरातील नीरा-भीमा हा पहिला साखर कारखाना बंद झाला. तर ५ मार्च रोजी कर्मयोगी शंकरराव पाटील, २३ मार्च रोजी श्रीनाथ म्हस्कोबा, बारामती ॲग्रो बंद झाले आहेत. जिल्ह्यात एकूण सहकारी ९ व खासगी पाच साखर कारखाने सुरू झाले होते. या साखर कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता अडीच ते आठ हजार मेट्रिक टन आहे. जिल्ह्यात सर्व साखर कारखान्यांनी आतापर्यंत एक कोटी २५ लाख १२ हजार ९२६ टन उसाचे गाळप केले. त्यापोटी एक कोटी ३० लाख ७९ हजार ६६५ क्विटंल साखरेचे उत्पादन केले आहे. साखर उतारा १०.४५ टक्के एवढा आहे.