सांगली : पाऊस घटल्याने आगामी गळीत हंगाम साखर कारखानदारीसाठी संघर्षाचा असेल, असे प्रतिपादन ‘विश्वास सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, आ. मानसिंगराव नाईक केले. कारखान्याच्या कामगार संघटनेमार्फत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार, कर्मचारी कुटुंबियांना मदत या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
कार्यक्रमात मुख्य लेखापाल भानुदास पाटील, गणपती पाटील (सुरक्षा विभाग), भानुदास भोळे (मिश्रण), शंकर सुतार (सिंचन), मुन्नीर संदे (यांत्रिकी) या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. किसन बापू येळवी (शेती) व एकनाथ बाळू चाळके (आसवणी) हे कर्मचारी सेवा काळात मयत झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना कामगार संघटनेमार्फत मदत देण्यात आली.
उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील व आपला बझार समूहाच्या अध्यक्ष सुनीतादेवी नाईक प्रमुख उपस्थित होत्या. आ. नाईक म्हणाले, लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांचा काळ संघर्षाचा होता. कारखानदारीत आधुनिक यंत्रणा कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. उपाध्यक्ष पाटील, संचालक विराज नाईक यांची भाषणे झाली. दत्तात्रय पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक अमोल पाटील, कामगार संघटना अध्यक्ष टी. एम. साळुंखे, सरचिटणीस विजयराव देशमुख आदी उपस्थित होते. विजय पाटील यांनी आभार मानले.