अहिल्यानगर : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) ने महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रास २१ एच. पी. कुबोटा ट्रॅक्टरसह रोटावेटर, पेरणी यंत्र, सारायंत्र, नांगर व रिजर अशी ५ अवजारे भेट दिली. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे यांनी या कार्यक्रमात विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील व पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांच्याकडे ट्रॅक्टरच्या चाव्या सुपूर्द केल्या.
यावेळी झालेल्या तांत्रिक चर्चासत्रामध्ये डॉ. राजेंद्र भिलारे, डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके, डॉ. थोरवे या शास्त्रज्ञांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. डॉ. सी. एस. पाटील म्हणाले की, म. फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या उसाच्या विविध वाणांसह ऊस लागवड तंत्रज्ञान शिफारशीमुळे राज्यात ऊस उत्पादनामध्ये क्रांती होत साखर उद्योगाची भरभराट झाली. कार्यक्रमाला द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, कार्य. संचालक अजित चौगुले, लोकमंगल समूहाचे चेअरमन महेश देशमुख, नाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन राऊत आदी उपस्थित होते.