कोल्हापूर : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने या हंगामामध्ये १२० दिवसांत १६ लाख १८ हजार ३०६ मे. टन इतके उसाचे गाळप केले. हंगाम समाप्तीनिमित्त उपाध्यक्ष बाबासो चौगुले आणि सन्मती चौगुले यांच्या हस्ते साखर पोत्यांचे पूजन केले. हंगामात कारखान्याकडे १६ हजार ४५० हेक्टर इतका ऊस गाळपासाठी आला, तर हेक्टरी सरासरी ९८ मे. टन ऊस उत्पादन मिळाले. कारखान्याचा ऊस गाळप हंगामाची सांगता नुकतीच झाली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आ. प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची घोडदौड सुरू आहे असे सांगण्यात आले. यंदाच्या हंगामात ऊस विकास योजनेतून खते, बी-बियाणे, तणनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, ठिबक सिंचन, क्षारपड जमीन सुधारणा यासाठी १० कोटी ४३ लाख ८४ हजारांचे वाटप करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली. यावेळी अण्णासाहेब गोटखिंडे, आदगोंडा पाटील, कमल पाटील, सुकुमार किणिंगे, उत्तम आवाडे, मनोहर जोशी, सर्जेराव हळदकर उपस्थित होते.