कोल्हापूर : मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने यंदा उसाची टंचाई जाव्णार अशी भीती व्यक्त केली जात होती, मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये यंदाही ऊस पीक चांगले आहे होते. काही कारखान्यांचा गाळप हंगाम आताही सुरु आहे, मात्र तोडणीचे नियोजन कोलमडल्याने शेतकऱ्यांवर नाईलाजास्तव ऊस पेटवण्याची वेळ आली आहे.
साखर कारखान्यांचे तोडणी वेळापत्रक पुरते कोलमडले आहे. त्यातच ऊस तोडणी टोळ्यांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळली जात असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस तोडणीकडे कारखाना प्रशासनाने दुर्लक्ष करून कार्यक्षेत्राबाहेरील कर्नाटकातील ऊस गाळपासाठी आणण्याचा सपाटा लावल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव ऊस पेटवण्याची वेळ आली. ऊस तोडणी टोळ्या वशिल्याने ऊस तोडत असल्यामुळे प्रामाणिक ऊस उत्पादक शेतकरी वैतागले आहेत. त्यामुळेच त्यांनी उसाला तत्काळ तोड मिळवण्यासाठी उसाला आग लावण्याचे प्रकार वाढले आहेत.