पुणे : एका कंपनीने विक्री केलेल्या ४२ ऊसतोडणी मशिनमध्ये बिघाड झाल्याने मशीन मालक त्रस्त झाले आहेत. सव्वाकोटी रुपयांचे तोडणी मशिन हे शासन अनुदानाविना खरेदी करून मशिन बंद राहण्याने बँकांच्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन न केलेल्या तोडणी मशिनबाबत कारवाई करावी, अन्यथा साखर आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशिनमालक संघटनेने दिला.
राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेचे सचिव अमोल जाधव, रजत नलवडे, श्रीरंग जगताप, अमर वाघ, संजय दिवेकर, शिवाजी पासलकर, जगन्नाथ चांडे, उज्ज्वला भोसले आदींच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त कुणाल खेमनार यांची साखर संकुलामध्ये भेट घेतली. यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संबंधित कंपनीचा परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली. साखर आयुक्त खेमनार यांनी या विषयावर संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले.