कोल्हापूर : चालू गळीत हंगाम २०२३ – २४ मध्ये संताजी घोरपडे साखर कारखान्याने एकूण ७,०८,४५५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७,५०,००१ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याचा साखर उतारा ११.७२ टक्के आहे. कारखान्याने उसाला प्रती टन ३,२५० रुपयांप्रमाणे एकूण २३१ कोटी एफआरपी व तोडणी वाहतुकीची बिले ४३ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केलेली आहेत. कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.
अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले की, केंद्र सरकारकडून नुकतीच ‘सी हेवी’ मोलॅसिसपासून २० लाख लीटर्स इथेनॉल निर्मितीची परवानगी मिळाली असून, त्याचे उत्पादन दोन दिवसांपूर्वी सुरू झाले आहे. एकूण दीड कोटी लीटर्स इथेनॉल उत्पादन अपेक्षित आहे, तसेच १३ लाख लीटर्स रेक्टिफाईड स्पिरीट उत्पादित झाले आहे. प्रतिदिन १ लाख लीटर इथेनॉल निर्मिती इतक्या क्षमतेने विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले असून, इथेनॉल प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहे. एकूण ४८ लाख लीटर्स उत्पादन अपेक्षित आहे. रसापासून २४ लाख ४० हजार लीटर्स इथेनॉल निर्मिती केली आहे. बी हेवी इथेनॉल निर्मिती ६० लाख, ८६ हजार लीटर्स केली आहे. सहवीज प्रकल्पामध्ये या हंगामात ७,९३,७८,३१० युनिटस् वीज तयार झाली आहे. त्यापैकी महावितरणला ५, २८, ४९, ५०० युनिटस् वीज निर्यात केली, असे मु्श्रीफ यांनी सांगितले.