धाराशीव : साखर उद्योगाची प्रयोगशील पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रांजणी येथील नॅचरल शुगर हा खासगी साखर कारखान्याने प्रतिकूल परिस्थिती असतानाही तब्बल १५८ ‘क्रशिंग डे’ पूर्ण केले. चेअरमन कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने गाळप क्षमता वृद्धिंगत करून योग्य गाळप नियोजन केले. कमी दिवसांत अधिक गाळपाची उद्दिष्टपूर्ती साध्य केली. शनिवारी पहाटे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते गव्हाणपूजन करून यंदाच्या हंगामाची सांगता करण्यात आली. यंदा विक्रमी ९ लाख ४५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण करून २२व्या गाळप हंगामाची सांगता झाली.
यंदा कार्यक्षेत्रातील नोंदवलेल्या शत-प्रतिशत उसाचे गाळप साध्य झाले आहे. यातून ९ लाख ४५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले. कारखान्याने सात लाख ८० हजार क्विटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. नॅचरल शुगरने गाळपात जिल्हा, साखर आयुक्तालयाचा सोलापूर उपविभाग व मराठवाड्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कारखान्याने ऊसविकास, पूरक उद्योग, शेतकरी, तोड व वाहतूक यंत्रणा यांसंदर्भात उल्लेखनीय काम करत आला आहे. यंदाही कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस होता. योग्य नियोजन व सर्व कर्मचारी, शेतकरी, तोड व वाहतूक यंत्रणा यांच्या सहकार्यातूनच हे शक्य झाल्याचे सांगण्यात आले.