भारत हा साखरेचा जगातील सर्वात मोठा ग्राहक आहे. साखर उद्योग हा देशातील सर्वात महत्त्वाचा कृषी-आधारित उद्योग म्हणून ओळखला जातो. देशातील सुमारे 5 कोटी शेतकरी कुटुंब आणि 5 लाख कामगार साखर उद्योगाशी थेट जोडले गेले आहेत. देशातील साखर उद्योगाला फार मोठा इतिहास आहे. देशात ऊस पिकाची सुरुवात आणि त्याचा टप्प्याटप्प्याने झालेला विकास खूपच रंजक आहे. आपण या लेखातून ऊस विकासाचे विविध टप्पे जाणून घेणार आहोत…
ईशान्य भारतात उसाची प्रथम लागवड…
विश्वकोषात दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य भारतातील सुपीक ब्रम्हपुत्रा नदी खोरे आणि आसाम, अरुणाचाल प्रदेश येथे उसाची प्रथम लागवड झाली. वनस्पती वैज्ञानिक आणि प्राचीन वाङ्मयातील संदर्भ या मताला पुष्टी देताना दिसतात. इ.स.पूर्व १८०० ते १७०० च्या दरम्यान हा ऊस चीनमध्ये पोहचला. ब्रह्मपुत्रा नदीखोरे आणि चीनची सीमा जवळजवळ असल्यामुळे हा प्रवास सुकर होणे स्वाभाविक होते. त्यानंतर ऊस फिलीपिन्स, जावा व हवाई बेटे येथे दिसतो. अलेक्झांडर द ग्रेट याने भारतावर इ.स. पूर्व 325 मध्ये आक्रमण केले. जवळजवळ 19 महिने त्याचे या भूमीत वास्तव्य होते. त्याचा एक सेनाधिकारी ‘नीअरकुस’ याने इ.स. पूर्व 327 मध्ये तयार केलेल्या अहवालात ‘भारतात असा एक वेत आहे की त्यापासून मधमाशांच्या मदतीशिवाय मध मिळविता येतो’ असे लिहून ठेवले आहे.
सातव्या व नवव्या शतकात भूमध्य सागरी खो-यात ऊस लागवड…
सातव्या व नवव्या शतकात अरबांनी निकट पूर्वेतून उत्तर आफ्रिका ते स्पेनपर्यंत लढाईत विजय मिळविले. त्यामुळे भूमध्य सागरी खो-यात उसाची लागवड सुरु झाली. त्याकाळी ‘व्हेनिस’ हे शहर साखरेच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. पंधराव्या शतकाच्या प्रारंभी पोर्तुगीज व स्पॅनिश लोकांनी ऊस अटलांटिक महासागरापलीकडे नेला. मादिरा, अझोर्स व केप व्हर्द बेटावर त्यांनी उसाची लागवड केली. 1508 मध्ये पेद्राद अत्येझा यांनी सांता दो मिंगोच्या सभोवती उसाची लागवड केली आणि हा उद्योग पश्चिम गोलार्धात पोहचला. कॅरिबियन बेटावर उसाची लागवड सुरू झाल्यावर 30 वर्षाच्या आत ऊस पीक हे वेस्ट इंडिजमधील एक महत्त्वाचे शस्त्र बनले आणि या बेटांना ‘शर्करा बेटे’ म्हणून संबोधले जाऊ लागले.
वेस्ट इंडिज येथून हा उद्योग पसरला दक्षिण अमेरिकेत…
वेस्ट इंडिज येथून हा उद्योग दक्षिण अमेरिकेत पसरला. या उद्योगाच्या वृद्धीसाठी त्यांनी आफ्रिकेतून गुलाम आयात केले. साखर उद्योग आणि गुलामगिरीची पद्धत यामध्ये तंटा बखेडे एवढे वाढले की त्यातून 18 व 19 व्या शतकात या बेटावर सशस्त्र उठाव झाले. अमेरिकेत लुईझिअनो येथे प्रथम उसाची लागवड झाली. 1751 मध्ये सांता दो मिंगोतील जेसुइट पंथातीत लोकांनी त्याची सुरवात केल्याचा इतिहास सांगतो. त्यानंतर 40 वर्षांनी अंतोनिओ मेंडेझ आणि एत्येन द बोर यांनी सध्याच्या न्यू ऑर्लीन्समध्ये उसाची लागवड करुन सर्वसाधारण वापराची साखर परिष्कृत करण्याचा प्रयत्न केला. यातून या सर्व वसाहतीत उसाचे मळे उभे राहिले. अमेरिकन क्रांतीची पाळेमुळे शोधत असताना हाच उद्योग त्याला कारणीभूत ठरल्याचे दिसतो.
18 व्या शतकात बीटपासून साखर निर्मितीचा लागला शोध…
18 व्या शतकात बॅबिलोनिया, इजिप्त व ग्रीस येथे बीटचे पीक मोठ्या प्रमाणात होते.1844 मध्ये जर्मन रसायनशास्त्रज्ञ आंड्रियास सिजिसमुड यांना बीटमधील साखर ही उसातील साखरेसारखीच असल्याचे संशोधनात आढळले. 1799 मध्ये त्यांचे शिष्य फ्रांट्स आकार्ड यांनी बीटपासून साखर मिळविण्याची व्यावहारिक पद्धत विकसित केली. त्यानंतर बीस बीटपासून साखर तयार करण्याचे कारखाने यूरोप व रशियात उभे राहिले. या पिकाला 19 व्या शतकात मोठ्या प्रमाणात बळ मिळाले. फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट यांची आर्थिक कोंडी करण्याचा एक डाव म्हणून त्यांची साखर रसद बंद केली आणि त्यातूनच नेपोलियनने साखर तयार करण्यासाठी बीटच्या लागवडीला प्रोत्साहन दिले. सध्या जगात साखर उत्पादन करणारे 133 देश आहेत. त्यामध्ये उसापासून साखर बनविणारे 94 तर बीटपासून साखर बनविणारे 39 देश आहेत.
भारतात साखर उद्योगाची 80,000 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल…
निती आयोगाच्या मार्च २०२० च्या रिपोर्टनुसार, भारत हा साखरेचा जगातील सर्वात मोठा ग्राहक आहे. साखर उद्योग हा देशातील सर्वात महत्त्वाचा कृषी-आधारित उद्योग आहे. साखर उद्योगातील कोणत्याही घडामोडीचा परिणाम देशातील सुमारे 5 कोटी शेतकरी कुटुंब आणि 5 लाख कामगारांच्या रोजीरोटीवर होतो. देशात सुमारे 340 लाख मेट्रिक टन साखरेची गाळप क्षमता आणि सुमारे 80,000 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेले 700 हून अधिक साखर कारखाने आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेत साखर उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. ऊस उत्पादक, उसतोडणी मंजूर आणि कामगार वर्गाच्या जीवनमानाशी संबंधित असणारा हा उद्योग आज संक्रमणावस्थेतून वाटचाल करीत आहे.
साखर हा माणसाच्या उर्जेचा एक महत्त्वाचा घटक …
साखर हा माणसाच्या उर्जेचा एक महत्त्वाचा घटक आहे. भारतात तयार होणाऱ्या साखरेपैकी 40%, साखर औद्योगिक वापरासाठी, 24%, साखर शीतपेयासाठी, 19% साखर मद्यार्कासाठी तर 17% साखर घरगुती वापरासाठी वापरली जाते. रासायनिक उद्योगातही साखरेचा वापर केला जातो. अखाद्य पदार्थाच्या उद्योगातही साखर वरदान ठरलेली आहे. सिमेंट मिश्रण, कातडी कमावण्यासाठी, वेदनाशामक औषधे, स्फोटक द्रव्ये तयार करण्यासाठी जमिनीच्या सुपीकतेसाठी, छपाईच्या शाईसाठी अशी बहुविध गुणयुक्त साखर वरदान असूनही प्रतिवर्षी संघर्षाच्या मैदानात उभी आहे.
(प्रा. डॉ. जालंदर पाटील हे सेवानिवृत्त प्राध्यापक तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्याशी आपण 9421201500 या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता.)