सोलापूर : सोलापूर-बार्शी महामार्गावरील काळेगाव येथील दीपक घायतिडक यांनी उसाच्या पाचट बंडल बांधणीतून व्यवसायाची नवी वाट शोधली आहे. अलीकडे ऊस पाचट न जाळता त्याचा सेंद्रिय खत म्हणून शेतकऱ्यांकडून वापर वाढला आहे. त्यामुळे व्यवसायानिमित्त फिरताना पाचटाला असलेली मोठी मागणी दीपक यांनी ओळखली. या पाचटाच्या गाठी (बंडल्स) बांधण्याच्या यंत्राची माहिती मिळवून या व्यवसायाची संकल्पना त्यांनी आखली. गेल्या चार वर्षांपासून त्यांनी बार्शी तालुक्यातील वैराग, मोहोळ, माढा, करमाळ्यासह धाराशिवमधील तुळजापूर, कळंब, बीड जिल्ह्याच्या काही भागांपर्यंत आपले ग्राहक तयार करत या व्यवसायात आपला चांगला जम बसवला आहे.
‘ॲग्रोवन’ मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, दीपक यांना पाचटाची बंडल्स तयार करून ती शेतकऱ्यांना पुरवण्याचा व्यवसाय करण्याची संकल्पना सुचली. पण या यंत्राची किंमत सतरा लाख रुपये होती. त्यांनी घरातील काही किमती वस्तू गहाण टाकून व पैशाची जुळवाजुळव करून नऊ लाख रुपयांना जुने यंत्र खरेदी केले. यामध्ये ट्रॅक्टरचलित दोन स्वतंत्र यंत्रे आहेत. यापैकी पहिल्या यंत्राला जाड तारेसारखी फावडी बसविली आहेत. ट्रॅक्टरला जोडल्यानंतर ते पाचट सरीच्या एका बाजूला गोळा करते. बेलरच्या माध्यमातून पाचटाच्या स्वयंचलित पद्धतीने गाठी बांधल्या जातात.
यंत्राच्या स्प्रिंगमधून पाचट यंत्रात ओढले जाते. आत पाचटाचे तुकडे होऊन स्वयंचलित पद्धतीने गाठी बाहेर येतात. दोन्ही यंत्रांसाठी दोन स्वतंत्र ट्रॅक्टर्स. एक ट्रॅक्टर पाचट गोळा करते आणि दुसरे ट्रॅक्टरगाठी तयार करण्याचे काम करतो. प्रती टन ऊस पाचटापासून सरासरी १४ ते १५ गाठी तयार होतात. एकरी ६० टन ऊस असल्यास सुमारे ८०० ते ८४० गाठी तयार होऊ शकतात. प्रति गाठ १० किलो वजनाची भरते आणि प्रति दिवसात हे यंत्र १५०० पर्यंत गाठी तयार करू शकते असे दीपक यांनी सांगितले. शेतकऱ्याचा ऊस असल्यास प्रति नग २० रुपये दराने जागेवर बंडल्स तयार करून देण्यात येतात. अन्य ठिकाणाहून पाचट आणून इच्छुक शेतकऱ्यांना पुरवण्यासाठी हाच दर ३० रुपये असतो.