पुणे : राज्यातील ऊस गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये १५ साखर कारखान्यांनी सुमारे ४४० कोटी ३२ लाख ८९ हजार रुपयांची एफआरपी थकवली आहे. साखर आयुक्त कुणाल खेमनार यांनी या कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. कारखान्यांची शुक्रवारी, दि. १२ रोजी साखर आयुक्तालयात सुनावणी होणार आहे. शेतकऱ्यांना उसाची रास्त व किफायतशीर किंमत (एफआरपी) देणे क्रमप्राप्त असतानाही ६० टक्क्यांच्या आत एफआरपी न दिलेल्या कारखान्यांना प्राधान्याने नोटिसा देण्यात आल्या आहेत.
कारखान्यांना थकीत एफआरपप्रश्री म्हणणे मांडण्याची संधी…
साखर कारखान्यांना थकीत एफआरपप्रश्री म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येत आहे. त्यानंतरही रक्कम देण्यास उशीर झाल्यास व्याजासह कारखान्यावर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले जातील. एफआरपी थकीत असलेल्या कारखान्यांमध्ये कोल्हापूरमधील २ सहकारी, धाराशीवचे ३ खासगी कारखाने, सोलापूर १ सहकारी व २ खासगी, अहमदनगरमधील ३ सहकारी, हिंगोली १ सहकारी, सातारा जिल्ह्यातील १ सहकारी, १ खासगी आणि सांगलीतील १ खासगी कारखान्याचा समावेश आहे.
राज्यात 7 एप्रिलपर्यंत 108.47 लाख टन साखर उत्पादन…
07 एप्रिल 2024 पर्यंत राज्यात 1059.18 लाख टन उसाचे गाळप झाले असून 1084.73 लाख क्विंटल (108.47 लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. मागील हंगामात याच वेळी 211 साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला होता आणि 1053.91 लाख टन उसाचे गाळप केले होते आणि 1052.38 लाख क्विंटल (105.23 लाख टन) साखरेचे उत्पादन केले होते. महाराष्ट्रातील चालू हंगामात मागील हंगामाच्या तुलनेत आतापर्यंत 178 साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. गेल्या हंगामात 07 एप्रिलपर्यंत 211 साखर कारखान्यांनी गाळप थांबवले होते. तसेच या हंगामात साखरेच्या वसुलीतही किंचित वाढ दिसून येत आहे. 2023-24 च्या हंगामात राज्यात 07 एप्रिल 2024 पर्यंत साखरेची रिकव्हरी 10.24 टक्के होती, तर गेल्या हंगामात या वेळेपर्यंत साखर रिकव्हरी 10.00 टक्के होती.
गाळप, साखर उत्पादनात अमरावती, नागपूर विभाग पिछाडीवर…
अमरावती विभागात 4 साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. त्यात 1 सहकारी आणि 3 खाजगी कारखान्यांचा समावेश होता. या विभागातील गाळप हंगाम समाप्त झाला आहे. या विभागात 9.94 लाख टन उसाचे गाळप होऊन 9.34 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा 9.4 टक्के आहे. नागपूर विभागात 4 खाजगी कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला होता. त्यांनी 4.44 लाख टन उसाचे गाळप करून 2.87 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा सरासरी साखर उतारा राज्यात सर्वाधिक कमी 6.46 टक्के इतका आहे.