गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याकडून तोडणी वाहतूक करार सुरू

सातारा : आजपर्यंत कारखान्याचे ऊस तोडणी वाहतूक करार हे साधारण मे महिन्यात केले जातात. मात्र लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याकडून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या कराराचा शुभारंभ करून एक पाऊल पुढे टाकले आहे. आगामी २०२४-२५ या वर्षासाठी ऊस तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग नलवडे म्हणाले की, राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन यशराज देसाई यांच्या प्रयत्नातून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने आपली प्रगती कायम राखण्यात यश मिळवले आहे.

यावेळी शेतकऱ्यांनी कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना न घालता नोंद केलेला संपूर्ण ऊस हा आपल्याच लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यास गळीताकरीता पाठवावा, असे आवाहन करण्यात आले. पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस पिकाचे अधिक उत्पादन घ्यावे असे आवाहन करण्यात आले. शिवाजीराव देसाई, ऊस तोडणी वाहतूक संस्थाचे चेअरमन राजाराम जाधव, शेती अधिकारी वैभव नलवडे, सचिव नवनाथ साळुंखे, केन यार्ड सुपरवायझर मानसिंग मोरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here