सोलापूर : शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही ऊस बिले न दिल्याप्रकरणी मकाई कारखान्याचे तत्कालीन चेअरमन तथा माजी आमदार पुत्र दिग्विजय बागल यांच्यासह १७ संचालकांवर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आळजापूर येथील समाधान शिवदास रणसिंग यांनी करमाळा न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. न्यायाधीश बी. ए. भोसले यांनी ४ एप्रिल रोजी मकाईच्या तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.
पोलिसांनी दिग्विजय बागल, उत्तम विठ्ठल पांढरे, महादेव निवृत्ती गुंजाळ, नंदकिशोर विष्णुपंत भोसले, गोकुळ बाबुराव नलवडे, बाळासाहेब उत्तम सरडे, महादेव त्रिबंक सरडे, सुनिल दिंगबर शिंदे, रामचंद्र दगडु हाके, धर्मराज पंढरीनाथ नाळे, नितीन रामदास राख, रंजना बापु कदम, उमा सुनिल फरतडे, राणी सुनिल लोखंडे, संतोष साहेबराव पाटील, दत्तात्रय म्हाळु गायकवाड, प्र. कार्यकारी संचालक हरिशचंद्र प्रकाश खाटमोडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. १६ संचालक आणि तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालकांचा यात समावेश आहे. पोलिस उपनिरीक्षक विनायक माहूरकर हे तपास करीत आहेत.