पुणे : पुणे विभागातील २८ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला आहे. यंदा गळीत हंगामात सुमारे ३१ साखर कारखाने सुरू झाले होते. कार्यक्षेत्रात उसाचे कमी उत्पादन आणि वाढत्या उन्हाच्या चटक्यामुळे साखर कारखान्यांनी आपले गळीत हंगाम लवकर आटोपते घेतल्याचे दिसते. विभागात सध्या फक्त तीन साखर कारखाने सुरू आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले ऊस तोडणी मजूर आता आपापल्या गावी परतू लागले आहेत.
यंदा सुमारे साडेपाच महिने साखर कारखाने सुरू राहिले आहेत. पुणे विभागात हंगामात ३४ साखर कारखान्यांपैकी ३१ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला होता. चालू वर्षी उसाची उपलब्धता अधिक असल्याने शासनाने एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पावसामुळे गळीत हंगाम सुरू होण्यास विलंब झाला. विभागातील पुणे, सातारा जिल्ह्यांतील १० नोव्हेंबरनंतर साखर कारखान्यांचे धुराडे पेटवत गाळप हंगाम सुरू केला. त्यामुळे कारखाना कार्यस्थळावर चांगलीच लगबग पाहावयास मिळाली होती.