सातारा : खंडाळा आणि भुईंज या दोन्ही किसन वीर सहकारी साखर कारखान्यांच्या भवितव्यासाठी मी आमदार मकरंद पाटील यांना लागेल ती मदत करायला तयार आहे. त्यांच्या पाठीशी मी ठाम उभा राहीन, असे प्रतिपादन सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. आमदार मकरंद पाटील, जि. प.चे माजी कृषी सभापती शशिकांत पिसाळ, माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस प्रतापराव पवार, जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम, जिल्हा बँक संचालक दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र लवंगारे आदी प्रमुख उपस्थिती होते.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, भाजप सरकारने अनेक निर्णय घेतले. साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन वाढीसाठी प्रयत्न चालू आहेत. मी स्वतः ऊस लावून अजिंक्यतारा, किसनवीरला घालणार आहे. एका शेतातील ऊस किसन वीरला तर दुसऱ्या शेतातील ऊस अजिंक्यतारा कारखान्याला पाठवणार आहे, अशी उदयनराजेंनी घोषणा केली. दरम्यान, आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले की, खंडाळा कारखाना आणि भुईंज येथील किसन वीर दोन्ही कारखाने अडचणीत आहेत. दोन्ही तालुक्यातील ८५ हजार कुटुंबे या कारखान्यावर अवलंबून आहेत. कारखान्यांची जबाबदारी आमदार म्हणून मी घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून मदत केली जात आहे. यावेळी मेळाव्यासाठी वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.