सोलापूर : माळीनगर कारखान्याचे विस्तारीकरण करणे मला गरजेचे असून, येथील नेतृत्वाची ताकद वाढवून कारखान्याला आर्थिक मदत करण्याचा शब्द मी देतो, असे प्रतिपादन माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी केले. माढा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माळीनगर येथील राजेंद्र गिरमे यांच्या ‘गोकुळ’ निवासस्थानी दोन मे रोजी माळीनगर परिसरातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. याप्रसंगी नाईक-निंबाळकर बोलत होते. माळशिरस तालुक्यातील दहशतीचे वातावरण मुळासकट मोडून काढू, असेही ते म्हणाले.
राजेंद्र गिरमे म्हणाले, अकलूज परिसरातील १९७० पासून असणारी दहशत मी अनुभवतो आहे. माळीनगर कारखाना कसा बंद पडेल व माळीनगर गाव कसे उद्ध्वस्त होईल, याचीच काहीजण काळजी करत आहेत. अशा दहशतीला न घाबरता सर्वांनी काम करा आणि खा. निंबाळकर यांना आपल्या तालुक्यातून किमान पाच ते दहा हजारांचे मताधिक्य देण्याचे काम करू या. याप्रसंगी कारखान्याचे संचालक परेश राऊत, के. के. पाटील, ॲड. भानुदास राऊत, मोहन लांडे, उत्तम खांडेकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका कार्याध्यक्ष सागर घाडगे, अक्षय गवळी, शिवसेनेचे राजाभाऊ हिवरकर, जनसेवा संघटनेचे अण्णासाहेब शिंदे, शिरीष फडे, व्यापारी संघटनेचे रिंकू राऊत आदी उपस्थित होते..