कोल्हापूर : सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस हंगाम संपला आहे, तरीही काही गुऱ्हाळघरे मात्र अखंडपणे सुरूच आहेत. विशेषतः राधानगरी तालुक्यातील हंगाम संपला तरीही येथील गुऱ्हाळघरे जोमात आहेत. गुऱ्हाळासाठी कर्नाटकातून ऊस पुरवला जातो. यातून फारसे पैसे मिळत नाहीत, मात्र मजुरांना कायमचा रोजगार मिळतो. त्यामुळे गुऱ्हाळघरे सुरू ठेवली असल्याचे गुऱ्हाळ मालकांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता गुऱ्हाळघराचा व्यवसाय सुरू केला आहे. यासाठी कर्ज काढून गुंतवणूक केली आहे. तीन ते चार महिने जिल्ह्यातून ऊस पुरवठा होतो. नंतर अनेक गुऱ्हाळघरे बंद होतात. मात्र गुंतवणूक, कर्जाचे व्याज कमी कालावधीत फिटत नाही. त्यामुळे कर्नाटकातून ऊस आणून अनेकांनी व्यवसाय सुरू ठेवले आहेत. सध्या मार्केटमध्ये गुळाला प्रतवारीनुसार, ३९०० ते ४१०० रुपये दर मिळत आहे. यात फारसा फायदा राहत नसला तरी मजुरांना कायमचा रोजगार मिळतो आणि व्यवसायही सुरू रहातो यासाठी काम सुरू ठेवल्याचे गुऱ्हाळ मालकांनी सांगितले.