कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील साखर कारखानदार, सहकारी बँकांच्या प्रमुखांशी चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गेल्या दोन दिवसांत पडद्यामागून जोडण्या लावल्या. या दोन्ही मतदारसंघात २३ साखर कारखाने आहेत. त्यापैकी कोल्हापूर मतदारसंघात १५ आणि हातकणंगले मतदारसंघात ८ आहेत. दोन्हीकडे ११ सहकारी, तर १२ खासगी कारखानदार आहेत. त्या सगळ्यांसह प्रमुख बँकांचे पदाधिकाऱ्यांशीही अमित शहांनी संवाद साधला आहे. त्यांच्यापर्यंत योग्य संदेश पोहोचला आहे.
महायुतीच्या उमेदवारांसाठी जोडण्या लावण्यांसाठी ठाणे, पुण्यातील टीम कोल्हापुरात तळ ठोकून आहे. आघाडीतील काही मासे गळाला लागतात का? यावर ते नजर ठेवून आहेत. कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसचे शाहू छत्रपती व शिंदेसेनेचे संजय मंडलिक यांच्यात निकराची झुंज आहे. शाहू छत्रपतींची उमेदवारी लवकर जाहीर झाल्याने ते वातावरण तयार करण्यात यशस्वी झाले. हातकणंगलेमध्ये उद्धवसेनेने ऐनवेळी सत्यजित पाटील-सरुडकर यांची उमेदवारी जाहीर केली. येथे अस्तित्वाची तिरंगी लढत होत आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह हे एक दिवस येऊन गेले. त्यांनीही अनेकांशी चर्चा केली आहे.