पुणे : जिल्ह्यातील ऊस गळीत हंगाम २०२३- २४ संपुष्टात आला आहे. साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील १४ कारखान्यांकडून एक कोटी ३२ लाख ४४ हजार २६७ टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. त्यातून एक कोटी ४० लाख ४ हजार ४०७ क्विटल साखर उत्पादन तयार झाले आहे. १०.५७ टक्के सरासरी उतारा मिळाला आहे. यंदा सुमारे पाच लाख ५२ हजार ६०९ टनांनी जादा ऊसगाळप झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी, एक कोटी २६ लाख ९१ हजार ६५८ टनइतके ऊसगाळप पूर्ण झाले होते.
बारामती अॅग्रो लिमिटेड या खासगी साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक २१ लाख ५४ हजार ७९४ टन ऊस गाळप केले आहे. कारखान्याने ९. ३३ टक्के उताऱ्यानुसार १९ लाख ८६ हजार ७२५ क्विंटल इतके सर्वाधिक साखर उत्पादन तयार केले आहे. त्यानंतर दौंड शुगर प्रा. लि. हा खासगी कारखाना दुसऱ्या स्थानावर आहे. या कारखान्याने १८ लाख एक हजार ८७७ टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. त्यांनी ९.५७ टक्के उताऱ्यानुसार १७ लाख २६ हजार २०० क्विटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे.