हिंगोली : टोकाई सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेण्याबाबत पूर्णा कारखान्याच्या सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी टोकाई कारखाना भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव अधिमंडळाच्या विशेष सर्वसाधारण सभेत ठेवताच सभासदांनी त्याला संमती दिली. शनिवारी पूर्णा कारखान्याच्या अधिमंडळाची ही विशेष सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी जयप्रकाश दांडेगावकर होते. ऊस विकास उपसमितीचे अध्यक्ष शहाजी देसाई, आमदार तथा कारखान्याचे संचालक राजू पाटील नवघरे, उपाध्यक्ष डॉ. सुनिल कदम आदी यावेळी उपस्थिती होते.
सभेत दांडेगावकर यांनी टोकाई सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यासाठी घेणे, कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारणीसाठी विचारविनिमय, धान्यावर आधारित आसवणी प्रकल्प आदी विषय मांडले. यावेळी पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे सभासद प्रल्हाद राखोंडे, उज्वला तांभाळे, ॲड. विजय अडकिणे, आबासाहेब सवंडकर, प्रकाश ढोणे आदींनी टोकाई भाडेतत्वावर घेण्यास विरोध दर्शवला. दांडेगावकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवा, असा शब्द देताच सभासदांनी हात उंचावून दांडेगावकर यांच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले.