सातारा : सातारा तालुक्यातील बागायती पट्ट्यात रासायनिक खते, धोकादायक कीटकनाशके, अतिरिक्त पाण्याचा वापर वाढल्याने जमिनी चोपण व क्षारपड होण्याचा धोका वाढला आहे. ऊस पीक काढले की त्यात पुन्हा ऊसाचे पीक घेण्याचे प्रमाणही अधिक आहे. याचा जमिनीच्या पोषकतेवर सातत्याने परिणाम होत आहे. अलीकडील काही वर्षात बागायती पट्ट्यात शेतीतून अधिक उत्पादन मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडून केले जाणारे प्रयत्न भविष्यकाळात नुकसान करणारे ठरण्याची शक्यता आहे.
शेतकरी दिवसेंदिवस रासायनिक खते तसेच कीटकनाशके अधिक वापरत आहेत. पाण्याचाही वापर मोठ्या प्रमाणावर होतो आहे. त्यामुळे ऊस तसेच इतर बागायती पिकांचे उत्पादन घटत आहे. ऊसाचेही एकरी टनेज घसरल्याचे चित्र आढळून येते. सेंद्रिय खते, शेणखतांचा वापर जादा दरामुळे टाळला जातो. कीटकनाशकांच्या फवारण्या अधिक वाढल्याने त्याचाही जमिनीच्या पोषकतेवर परिणाम होत आहे.