सांगली : उदगिरी साखर कारखान्याने अकराव्या गळीत हंगामामध्ये ६ लाख ३७ हजार ८१६ मे. टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याने एकरकमी एफआरपी देण्याची परंपरा यावर्षीही जोपासली. हंगामात गाळप झालेल्या ६,३७,८१६ मे. टन उसास एकरकमी एफआरपी ३१०० रुपयांप्रमाणे होणारी एकूण रक्कम १९७ कोटी ७२ लाख रुपये सर्व संबंधित शेतकऱ्यांचे बँक अकाउंटमध्ये जमा केले आहेत. कारखान्याचे चेअरमन डॉ. राहुलदादा कदम यांनी ही माहिती दिली.
चेअरमन डॉ. राहुलदादा कदम म्हणाले की, संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची प्रगती सुरु आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार साखर कारखान्यात बी हेवी मोलॅसिसवर डिस्टिलरीमध्ये प्रक्रिया करुन इथेनॉल उत्पादन केलेले आहे. यावर्षी केंद्र शासनाने उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्यावर बंदी घातल्यामुळे कारखाने अडचणीत आलेले आहेत. पुढील वर्षी केंद्र शासनाने उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्यास परवानगी देवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे धोरण राबवावे, अशी अपेक्षा कदम यांनी व्यक्त केली. कारखान्याचे पूर्णवेळ संचालक उत्तम पाटील यांनी सांगितले की, आगामी गळीत हंगाम २४/२५ साठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेशी करार करण्याचे काम सुरु आहे. ज्यांना कारखान्याकडे वाहतुकीचे करार करावयाचे आहेत त्यांनी कारखान्याचे शेती विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.