धाराशिव : लोहारा तालुक्यातील लोकमंगल साखर कारखान्याकडून जानेवारी महिन्यापासूनची ऊस बिले अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. केंद्र शासनाच्या एफआरपी कायद्यानुसार ऊस कारखान्यास गेल्यानंतर ठराविक दिवसांत शेतकऱ्यांची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, असा नियम आहे. परंतु या नियमांना बगल देऊन शेतकऱ्यांना रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसून येते. लवकरात लवकर ऊस बिले न दिल्यात आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
लोहारा तालुक्यात लोकमंगल हा एकमेव साखर कारखाना आहे. माकणी येथील धरणामुळे उसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. लोहारा खुर्द येथील लोकमंगल कारखाना व केशेगाव, मुरूम व इतर कारखान्यांना ऊस पाठवला जातो. ऊस उत्पादनासाठी कष्ट केल्यानंतर तोडणीसाठी कारखान्यांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. ऊस तोडणाऱ्या टोळ्यांकडून दमछाक होते. त्यानंतर ऊस कारखान्यास गेला की रक्कम मिळण्यासाठी ५ महिने वाट पहावी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. शेतकरी ज्ञानेश्वर गोरे यांनी सांगितले की, चार महिन्यानंतरही ऊस बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे खरीपाची कामे करायची कशी असा सवाल आहे.