लातूर जिल्ह्यात यंदा ऊस लागवडीत झाली घट, खोडवा पिकावर भर

लातूर : जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांनी नव्याने लागवड न करता आहे तो खोडवा ऊस जोपासण्यावर भर दिला आहे. उन्हाळी हंगामात नव्याने ऊस लागवड झालेली नाही. तर १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या काळात केवळ १०,६६० हेक्टरवर ऊस लागवड असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यात उसाचे सरासरी क्षेत्र ५४ हजार ५५५ एवढे आहे. यापूर्वी ऊस लागवडीत दिवसेंदिवस वाढ होत होती. यंदा मात्र चित्र बदलले आहे. लातूर जिल्ह्यासह विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांची अशीच अवस्था आहे. जर यंदा सरासरी एवढा पाऊस झाल्यास थोडेफार चित्र बदलू शकते.

खरेतर १५ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत आडसाली हंगामातील उसाची लागवड होते. त्यानंतर १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत लागवडीचा काळ हा पोषक मानला जातो. या दोन्ही हंगामात कमी प्रमाणात लागवड झाली असली तरी उन्हाळी हंगामात मात्र लातूर, निलंगा वगळता इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी लागवडीकडे पाठ फिरविली आहे. यंदा दिवाळीनंतरच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्याने आडसाली तसेच उन्हाळी हंगामातील लागवडीवर परिणाम झाला होता. एकूण क्षेत्रापैकी सध्या ३१ हजार १४३ हेक्टरवर खोडवा ऊस आहे. त्यामुळे या क्षेत्रावरीलच ऊस जोपासण्यावरच शेतकऱ्यांचा भर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here