अहिल्यानगर : जिल्ह्यातील दहा साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप १४९ कोटींची एफआरपी दिलेली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता खरीप हंगामासाठीची मशागत, मुलांच्या शाळा प्रवाशाचे काय करायचे, असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर आहे. गाळप हंगाम संपून बराच कालावधी उलटून गेला आहे. कारखान्यांचे गाळप कधीच थांबले आहे. कारखान्याला पाठविल्यानंतर १५ दिवसांनी पैसे मिळतील असे गृहीत धरून शेतकऱ्यांनी नियोजन केले. मात्र, मे महिना संपत आला तरी दहा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिले दिलेली नाहीत.
अगस्ती सहकारी साखर कारखाना, गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन, गणेश सहकारी साखर कारखाना, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, शुगर अँड पॉवर, कुकडी सहकारी साखर कारखाना, प्रसाद शुगर अँड ॲग्रो प्रोडक्ट लि., मुळा सहकारी साखर कारखाना, अशोक सहकारी साखर कारखाना आणि केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून अद्याप शेतकऱ्यांन ऊस बिले मिळालेली नाहीत.
याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजित पोटे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, साखर कारखान्यांनी सन २०२३ २०२४ या गळीत हंगामातील पंधरवडा उसाचे पेमेंट २७ मेपर्यंत अदा करावे.अन्यथा तक्रारदार शेतकऱ्यांसह प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार आहे.