अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडच्या साखर कारखान्याने (युनिट चार) चालू वर्षी ८ लाख १४ हजार ६७९ मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण केले. गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकरी व वाहतुकदारांची सर्व बिले बँक खात्यामध्ये जमा केली आहे. कारखान्याने एकूण ३४६ कोटी रुपयांचे वितरण केल्याची माहिती ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी दिली. शिरुर तालुक्यातली मांडवगण फराटा येथे ऊस उत्पादक शेतकरी व वाहतूकदारांच्या बैठकीत ते बोलत होते.
बोत्रे- पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी पुढील वर्षी गाळपासाठी गौरी शुगर कारखान्याला ऊस द्यावा तसेच बाजारभावाची चिंता करू नये. तुम्ही केलेल्या कष्टाची जाण ठेवून बाजारभाव चांगलाच देणार आहे. पुढील वर्षी सर्वांत जास्त बाजारभाव देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. ऊस तोडीसाठी पुढील वर्षी हार्वेस्टरचा वापर करावा. यावेळी कार्यकारी संचालक आर. डी. यादव, शेती अधिकारी विकास क्षीरसागर, नवनाथ देवकर, सुनील साठे, समीर जकाते, शशिकांत चकोर, संजय तावरे, माऊली जगताप, राजेंद्र बोत्रे, दिगंबर बोत्रे, नवनाथ फराटे, नवनाथ गायकवाड, राजेंद्र बोत्रे, दत्तात्रय बोत्रे उपस्थित होते. नवनाथ दरेकर यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी बनसोडे यांनी आभार मानले.