कोल्हापूर : जिल्ह्यातील अनेक तालुक्यात यंदा वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे भाजीपाल्याच्या शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी आडसाली ऊस पीक भुईसपाट झाल्यामुळे उसाच्या वजनात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. जिल्ह्यात मागच्या काही दिवसात झालेल्या वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शिरोळ तालुक्यात मंगळवारी सायंकाळी पडलेल्या वळवाची भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याला मोठी आर्थिक झळ सोसावी लागली आहे.
मंगळवारी चंदगड तालुक्यात वळीव पावसाचा फटका मेंढपाळ, वीट व्यावसायिकांना बसला. पावसाने कूर, मिणचे, हेदवडे परिसराला अक्षरशः झोडपून काढले. शिरोळ तालुक्यातील हेरवाडमधील भाजीपाला पिकावर परिणाम झाला. काही शेतकऱ्यांचे दोडक्याचे प्लॉट भुईसपाट झाले आहेत. टोमॅटोच्या शेतात पाणी साचले. ढगाळ व उष्ण हवामानामुळे भाजीपाला पिकावर वेगवेगळ्या प्रकारची कीड निर्माण होणार असल्याने शेतकऱ्यांना कीटकनाशकाची फवारणी करावी लागणार आहे.